अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ होऊ लागली आहे. घरफोडी, लूटमार आदी घटनां तर होत आहेच मात्र आता चोरट्यांकडून पशुधन चोरले जात असल्याचे प्रकार घडू लागला आहे.
लॉकडाऊनच्या काळात पोटाला चिमटा घेऊन मोठ्या जिकरीने जगवलेले पशूधन चोरीस गेल्यामुळे पशुपालक संतापले असून बेलापूर पोलिसांना बकरीचोर शोधण्याचे आवाहन करत आहेत.
दरम्यान नुकतेच बेलापूर गावातून शेळ्या चोरुन नेण्याचे प्रमाण वाढले असून यापूर्वी आठ शेळ्या चोरीस गेल्यानंतर मंगळवार दि. 15 रोजी पुन्हा पाच शेळ्या चोरीस गेल्या आहेत.
दिवसाढवळ्या हा प्रकार घडत असून शेळीचोर सापडत नसल्याने शेळी पालन करणार्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दि. 27 जानेवारी रोजी गावातून एकाच वेळी सहा शेळ्या चोरीस गेल्या होत्या.
त्या नंतर 4 फेब्रुवारी रोजी आणखी दोन शेळ्या चोरीस गेल्यानंतर 15 जून रोजी पुन्हा पाच शेळ्या चोरीला गेल्या आहेत. पोलिसांनी शेळ्या चोर शोधून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी पशुपालकांनी केली आहे दरम्यान पशुपालकांनी शेळ्याचोरी बाबत बेलापूर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली होती.
त्यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याचे समजते. शेळ्या चोरी वाढल्याने ग्रामस्थांचा संताप वाढला आहे. चारचाकी वाहनातून ही शेळ्याचोरी होत असल्याचे शेळीपालकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी तातडीने या चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.