अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- महिलांच्या सुरक्षेचा विचार करून जिल्ह्यात पुन्हा निर्भया पथके ऍक्टिव्ह केली आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथकाची स्थापना केली आहे. छेडछाड रोखण्यासाठी ही पथके शाळा, महाविद्यालये, बगीच्यांसह गर्दीच्या ठिकाणी वॉच ठेवतात.
स्त्यावर मुलींच्या आसपास वावरणारे व छेड काढणाऱ्या २ हजार ५७२ रोडरोमिओंवर गेल्या तीन वर्षांत निर्भया पथकाने कारवाई करत त्यांना कायद्याचा धाक दाखविला आहे. मुलींना त्रास देणाऱ्या अशा टुकारांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी मुली व पालकांमधून होत आहे.
कोरोनामुळे शाळा, विद्यालये व खासगी क्लासेस बंद असल्याने गेल्या काही दिवसांत मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण कमी झाले असले तरी एकटी मुलगी पाहून छेडछाडीच्या घटना सुरूच आहेत.
मुलींजवळ जाऊन जोराने मोटारसायकलीचा हॉर्न वाजविणे, शिट्या मारणे तर कधी थेट हात पकडून प्रेमाची मागणी करणे आदी प्रकार घडतात. शाळा, विद्यालये सुरू होताच मुलींना छेडछाडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा प्रवृत्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थिनी आणि पालकांमधून होत आहे.
दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांनी गजबजू लागली आहेत. व्हॉट्सॲप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियाच्या आहारी तरुण पिढी गेल्याने मुलींची छेड काढण्याचे प्रकार सर्रास होत असतात. एखाद्या विद्यार्थिनीच्या बाबतीत छेडखानीचा प्रकार घडल्यानंतर बदनामीच्या भीतीने बऱ्याचदा तक्रार केली जात नाही. त्यामुळे टवाळखोरांचे चांगलेच फावते.
तर लगेच या नंबरवर कॉल करा
नगर शहर व परिसरात कुणी मुलींची छेड काढत असेल तर निर्भया पथकाच्या १०९१ अथवा ९३७०९०३१४३ या क्रमांकावर संपर्क करावा. गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असे भरोसा सेलच्या उपनिरीक्षक पल्लवी उंबरहंडे यांनी सांगितले.