अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- नगर जिल्हा देखील आज महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही आहे असे दिसून येऊ लागले आहे. नुकतीच नगर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.
लग्नाची मागणी करणार्या तरूणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने विषारी औषध प्राशान करून आत्महत्या केली आहे. दरम्यान याप्रकरणी मयत मुलीच्या आईने फिर्याद दिली असून एका तरूणाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त, विनयभंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आबीद पापाभाई मोमीन शेख ऊर्फ मुन्ना शेख (रा. नालेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गेल्या वर्षापासून मुन्ना शेख हा पिडीत मुलीला त्रास देत होता. शेख याने पिडीत मुलीचे मोबाईलमध्ये फोटो काढून लग्नाची मागणी केली होती.
लग्न करावे यासाठी शेख याने पिडीताचा दुचाकीवरून पाठलाग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. शेख याच्या त्रासाला कंटाळून पिडीत मुलीने 20 ऑक्टोबर रोजी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. आरोपीवर तातडीने गुन्हा दाखल करून त्यास अटक करावी,
अशी मागणी तिच्या कुटुंबियांनी व नागरिकांनी करत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला होता. कोतवाली पोलिसांनी जिल्हा रूग्णालयात जावून मयत मुलीच्या कुटुंबियांशी चर्चा केली.
तसेच याबाबत तातडीने गुन्हा दाखल करण्यात येईल व आरोपीचा शोध घेण्यात येईल, असे सांगितले. दरम्यान, गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह कोतवाली पोलीस ठाण्यात आणला होता. अखेर आरोपी तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.