खते व बियाणांच्या दुकानावर छापा! तब्बल ४०प्रकारची खते व बियाणे जप्त!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :-  श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव, तांदळी दुमाला, टाकळी लोणार येथील कृषी दुकानांवर श्रीगोंदा तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात छापा टाकला.

यावेळी अवैधरित्या आढळुन आलेले ४० विविध प्रकारचे खते व बि बियाणे जप्त करण्यात आली असून, संबंधित कृषी दुकानदारांना या तफावतीबाबत खुलासा मागितल्याचे तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी सांगितले.

याबाबत सविस्तर असे की श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव, तांदळी दुमाला, टाकळी लोणार येथील चक्रधर आंधळे यांच्या प्रणव कृषी केंद्र नावाच्या तीन दुकानांमध्ये खते तसेच कांद्याचे व इतर विविध प्रकारचे बी बियाणे यांचा अवैध साठा केल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी केली होती.

त्या अनुषंगाने काल रात्री उशिरा पोलिस बंदोबस्तात तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ. म्हस्के तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी डॉ.राम जगताप यांच्या संयुक्त पथकाने टाकळी लोणार येथील कृषी दुकानावर छापा मारत तपासणी केली असता या ठिकाणी खतांच्या साठ्यात तफावत आढळुन आली तर कांदा बियाणांच्या साठ्यात तफावत आढळून आल्याने या दुकानाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, ते कांद्याचे बियाने जप्त केले.

त्यानंतर लोणार व तांदळी दुमाला येथे केलेल्या कारवाईत येथील कृषी दुकानात पॉज मशीनवर आधार लिंक न करता अनुदानित खतांची विक्री करण्यात आल्याची बाब समोर आली.

याप्रकरणी साठापुस्तक व प्रत्यक्ष स्टॉक यांच्यात मोठी तफावत आढळून आली तसेच ४० प्रकारचे बी- बियाणे व खते दुसऱ्या ठिकाणी लपविल्याचे लक्षात आल्याने या दोन्ही दुकानातील खते व बियाणे जप्त करत या दुकानदारांना खुलासा मागितल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. कृषि विभागाच्या या धडक कारवाईने मात्र इतर दुकानदारात खळबळ उडाली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24