पेरणीसाठी खते – बी -बियाणांची खरेदी केली मात्र पावसाअभावी बळीराजा झाला चिंतातुर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :-  जूनच्या सुरुवातीलाच पाऊस सर्वत्र सक्रिय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना जून महिना अर्धा संपला तरी पावसाने हवी तशी हजेरी अद्यापही जिल्ह्यात लावलेली नाही.

यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये पेरणी प्रश्नावरून मोठी समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान बुधवारी जिल्ह्यातील राहाता तालुक्यात दुपारच्या सुमारास दमदार सरी कोसळल्या. मात्र ग्रामिण भागात अद्यापही पेरणी योग्य पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरणीला वेग आलेला नाही.

मशागत करून रान तयार केले असले तरी अद्याप शेतकर्‍यांना पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा आहे. मान्सुनची चाहूल लागली असली तरी पावसाची अवकृपा दूर होत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेच वातावरण पसरले आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

समाधानकारक पाऊस पडेल या आशेने अनेक शेतकर्‍यांनी बी-बियाणे खत खरेदी केले आहे. मात्र 15 जुन ओलांडून गेला तरी राहाता तालुक्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. सध्या कृषी सेवा केंद्रावर दिसणारी शेतकर्‍यांची लगबग कमी झाली आहे.

कृषी सेवा केंद्र चालकांनी आगाऊ पैसे भरून शेतीपुरक बी-बियाणे औषधींची खरेदी केली परंतु विक्रीच होत नसल्याने तेही हवालदिल झाले आहेत.

दरम्यान बळीराजा दमदार पावसाच्या प्रतिक्षेत असून या आठवडयात तरी समाधानकारक पाऊस पडेल आणि पेरणी करता येईल अशी आशा बाळगून आहेत. बाजारपेठेतही तेजी हवी असेल तर वरुणराजाची कृपा लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24