अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष, तालुका दुध संघाचे विदयमान अध्यक्ष दादासाहेब पठारे यांचे शुक्रवारी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले.
त्यांच्या मुळ गावी वडूले येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सतिश पठारे पाटील यांनी सांगितले.
सुमारे अडीच महिन्यांपूर्वी कोरोनाची बाधा झाल्यामुळे दादासाहेब यांना सुपे, नगर व तेथून पुणेे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आजार बळावल्यानंतर पुणे येथे उपचारादरम्यान त्यांनी कोरोनावर मात केली.
त्यांना आयसीयु मधून सामान्य कक्षातही हालविण्यात आले. प्रकृती सुधारत असतानाच ती खालावली असल्याचे सांगत डॉक्टरांनी दिड महिन्यांपूर्वी त्यांना लावण्यात आलेलेे व्हेंटीलेटर काढण्याचा निर्णय घेतला.
६ मे रोजी सकाळी व्हेंटीलेटर काढण्यात आल्यानंतरही दादासाहेब यांचा श्वाच्छोस्वास सुरूच होता. एकीकडे डॉक्टरांनी हात टेकले असताना दादासाहेबांची मात्र जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती होती.
त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ पुन्हा व्हेंटीलेटर लावण्याची सुचना करीत पुन्हा उपचार सुरू करण्यात आले. गेल्या दिड महिन्यांच्या काळात पठारे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र गुरूवारपासून प्रकृती खालावत जाऊन शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेली सर्व बंधने पाळून वडुले येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सतीश पठारे यांनी सांगितले.