अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- तलाठी कार्यालयात उतारा मागायला आलेला शेतकरी व तलाठ्याच्या हाताखाली काम करणारा मदतनीस (झिरो तलाठी) या दोघांत शाब्दिक चकमक झाली.
मात्र नंतर या दोघात चांगलीच हाणामारी झाली. हा गंभीर प्रकार पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील तलाठी कार्यालयात काल भर दुपारी घडला.
यामुळे संतप्त झालेल्या नागरीकांनी तलाठी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील तलाठी कार्यालयात प्रसाद गायकवाड हे शेतकरी ऑनलाइन उतारा मागण्यासाठी गेले होते.
यावेळी त्या ठिकाणी कामगार तलाठ्याससह त्यांच्या हाताखाली काम करणारा झिरो तलाठी देखील उपस्थित होता. आठ दिवसापूर्वी पैसे दिले तरी देखील मला अद्याप उतारा मिळालेला नाही मी आणखी किती दिवस तुमच्या मागे उताऱ्यासाठी फिरायचं, असा संतप्त सवाल या शेतकऱ्याने केला.
त्यानंतर झिरो तलाठी व या शेतकऱ्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर तलाठ्यासमोरच या दोघांमध्ये चांगलीच हाणामारी देखील झाली. नंतर या महोदयांनी तात्काळ मध्यस्ती करून हे प्रकरण मिटवलं व दोघांनाही कार्यालयाच्या बाहेर काढून दिले.
मात्र या प्रकार इतर शेतकऱ्यांना समजताच या घटनेचा निषेध करण्यात आला.तसेच त्याचबरोबर शासन नियमानुसार तलाठी कार्यालयात अनधिकृत कर्मचारी ठेवण्यास मनाई केलेली असताना देखील केवळ आर्थिक तडजोडी करण्यासाठी महसूलचे कर्मचारी अशा लोकांना पाठीशी घालण्याचे काम करत असून,
शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचे काम होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे अशा व्यक्ती पुन्हा कार्यालयात दिसल्या तर तलाठी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.