अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- अॅट्रॉसिटी गुन्ह्याविरोधी बेताल वक्तव्य केल्याने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा यांसह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने राहुरी तहसीलवरमोर्चा काढण्यात आला.
खामगाव तालुक्यातील दलित अत्याचार प्रकरणी चितोडा गावातील रमेश हिरवाळे या दलित तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती. ही घटना अत्यंत गंभीर असून देखील तेथील शिवसेनेचे आ. गायकवाड यांनी या गावात जाऊन चिथावणीखोर वक्तव्य करत दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत हा मोर्चा काढण्यात आला.
आमदारांवर कारवाई करा, अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर देखील भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिला.
तसेच राहुरी तालुक्यातील खडांबे येथील अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपी बाळासाहेब लटके यास तात्काळ अटक करावी, राहाता तालुक्यातील रांजणगाव येथील दलित युवक रवींद्र लोंढे याच्यावर काही गुंडांनी केलेल्या मारहाण प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करावी,
आदी मागण्यांचे निवेदन पोलिसांना देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलास साळवे, बाळासाहेब जाधव, विजय वाकचौरे, श्रावण वाघमारे,
सिमा बोरूडे, स्नेहल सगळगिळे, रमेश गायकवाड, गोविंद दिवे, सचिन साळवे, दत्तात्रय भोसले आदींसह भीमसैनिक उपस्थित होते.