अहमदनगर Live24 टीम, 11 जुलै 2021 :- मुंबईतील अँटॉप हिल पोलीस ठाण्यात मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
इंधन दरवाढीविरोधात बैलगाडीतून आंदोलन करत असताना बैलगाडी तुटली. त्यामुळे बैलांना इजा झाल्याने प्राणी मित्र संघटनेने अँटॉप हिल पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला. मुंबई काँग्रेसने इंधन दरवाढी विरोधात आंदोलन केले.
त्यावेळी अचानक बैलगाडीवर जास्त गर्दी झाल्याने ती तुटली आणि दोन बैलांच्या मानेला जखम झाली आहे. हा एक प्रकारे बैलांचा छळच होता. त्यामुळे या सर्वांवर वन्य प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.
महागाई विरोधात आंदोलन बैलगाडीवर उभे राहून काँग्रेस कार्यकर्ते तसेच भाई जगताप करत होते. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त लोक या बैलगाडीवर चढल्यामुळे ती जागेवरच तुटली. परिणामी कांग्रेस कार्यकर्तेही खाली कोसळले.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हे सुद्धा बैलगाडी तुटल्यामुळे जमिनीवर कोसळले. यावेळी गाडीचे नुकसान झालेच शिवाय बैलाच्या पायांना आणि मानेवर ईजा झाल्याचे सांगण्यात येत आहे.