अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- निधीचा वेळोवेळी अपहार केल्याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ गावच्या आजी माजी सरपंचांसह तत्कालीन ग्रामसेवक यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विस्तार अधिकारी सारीका हराळ यानी याबाबत फिर्याद दाखल केली असून त्यानुसार माजी सरपंच सुभाष माने, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ खामकर व विद्यमान सरपंच रामदास ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, लोणी चौकशीत निर्देशनास आलेल्या आर्थिक, प्रशासकीय अनियमिता, आर्थिक अपहार यास जबाबदार धरून सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे गटविकास अधिकारी यांनी आदेश दिले होते.
2018-19 वर्षांचे लेखा परीक्षण अहवाल ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच माने यानी 14 व्या वित्त आयोग या आराखड्यात समाविष्ट नसलेले काम केले तर विद्यमान सरपंच रामदास ठोंबरे यांनी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ खामकर त्यांच्या पदाचा गैरवापर करून लोणी व्यंकनाथ गावातील 14 व्या वित्त आयोगातील कामामध्ये आर्थिक अपहार,
प्रशासकीय अनियमीतता व आर्थिक अनियमीतता केल्याचे आढळून आले असल्याने या आजी माजी सरपंचांसह तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या चार वर्षांपासून ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू आहे. आत्ता फक्त 26 लाखांचा घोटाळा उघडकीस आला आहे.
अजून लाखो रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी सुरु आहे. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचपद नाममात्र आहे. याचा कर्ताकरविता दुसराच असून लवकरच त्याच्यावरही गुन्हे दाखल होणार आहेत.
जनतेचे व शासनाचे पैसे खाणारे लवकरच गजाआड होणार असल्याचे उपोषणकर्ते लोणीव्यंकनाथ येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र काकडे यांनी सांगितले.