अखेर शेवगाव पोलिस ठाण्यात बालविवाह प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- गेल्या काही दिवसांपासून शेवगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विवाह हे प्रकरण चर्चेत आले आहे. नुकतंच या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

नुकतेच त्या अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी मुलीची आई, आजी, मामा व नवरदेवावर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडीलाने फिर्याद दिली आहे. यातील तीन आरोपी हे शिरुर कासार तालुक्यातील बावी (येळंब) येथील असून आरोपी नवरदेव हा शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील आहे.

हा गुन्हा चकलंबा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शेवगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत पीडित मुलीच्या वडिलांनी म्हंटले आहे कि, माझे लग्न अंदाजे 18 वर्षापुर्वी झालेले असून माझी पत्नी हिचेपासुन मला तीन मुली व एक मुलगा आहे. माझे पत्नीबरोबर किरकोळ कारणावरुन वाद व्हायचे.

एके दिवशी माझी सासु आमच्या घरी आली व माझ्या पत्नीला व मुलांना घेऊन गेली. तेव्हापासुन मुले व माझी पत्नी हे परत माझ्याकडे आलेच नाही. एका नातेवाईकाने मित्राच्या फोनवर मुलगी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील केशव उर्फ सोमनाथ पांडुरंग भवर याचे सोबत लग्न करणार असल्याची लग्नपत्रीका पाठविली.

त्या लग्नपत्रीकेत दि. 18 ऑगस्ट 2021 रोजी कुढेकर वस्ती, बोधेगाव येथे विवाहस्थळ असल्याचे त्यात नमुद होते. त्याप्रमाणे मी दि. 17 ऑगस्ट 2021 रोजी चाईल्ड लाईन यांचा संपर्क क्रमांक 1098 वर फोन करुन अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याबाबत माहिती कळविली होती.

त्यानंतर दि. 22 ऑगस्ट 2021 रोजी मला कळाले की, माझ्या मुलीचा बालविवाह हा नियोजित ठिकाणी न करता अन्य ठिकाणी करण्यात आला.

याप्रकरणी माझ्या मुलीचा जाणिवपुर्वक बालविवाह हा पत्नी रंजना अंकुश बिलारे (वय 35 वर्ष), मेव्हणा बबलु विष्णू मोरे (वय 32 वर्षे), माझी सासू विजुबाई विष्णू मोरे (वय 62 वर्षे) व केशव उर्फ सोमनाथ पांडुरंग भवर यांनी करून दिला असून यांच्याविरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24