अखेर ‘त्या’ वादग्रस्त देशी दारु दुकानाची चौकशी सुरु

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमधील कासारा दुमाला येथील बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या देशी दारू दुकान चांगलेच चर्चेत होते.

मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या कृपने सुरु असलेल्या या दुकानांबाबत अनेक आक्षेप आल्यानंतर प्रशासन अखेर जागे झाले आहे. तक्रारींचा पाढा वाढल्याने अखेर या वादग्रस्त देशी दारूच्या दुकानाची चौकशी सुरू झाली आहे.

राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या चौकशीसाठी संगमनेर बाहेरील अधिकार्‍याची नियुक्ती केली असून या अधिकार्‍यांनी चौकशी सुरू केली आहे.

या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येणार असल्याने देशी दारू दुकानाच्या मालक व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नेमके प्रकरण काय? जाणून घ्या :- संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथे गेल्या काही वर्षांपासून हे देशी दारू दुकान सुरू आहे. ग्रामपंचायतीने कुठलाही ना हरकत दाखला दिलेल्या नसतानाही हे दुकान गावामध्ये खुलेआम सुरू आहे.

दुकान मालकाने दुकानाची जागा हस्तांतरित करताना भूमिअभिलेख खात्याचे खोटे कागदपत्र सादर करून दुकानाला परवाना मिळवण्याचे उघडकीस आले आहे. यामुळे या दुकाना विरुद्ध काही ग्रामस्थांनी उत्पादन शुल्कच्या संगमनेर येथील अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या होत्या.

मात्र या अधिकार्‍यांनी या तक्रारींची दखल घेतलेली नाही. मात्र त्यानंतर या प्रकरणाची दखल प्रसार माध्यमांनी घेतली त्यानंतर प्रशासन खडबडुन जागे झाले. अखेर राज्य उत्पादन शुल्कच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेतली.

या दुकानाला परवाना कसा दिला याची चौकशी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कच्या एका अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान अधिकार्‍यांच्या चौकशीत काय निष्पन्न होते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24