अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-शिर्डी शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची गरज लक्षात घेऊन चाकण येथून आठ ऑक्सिजन नुकताच शिर्डी शहरात पोलीस बंदोबस्तात दाखल झाला.
हा ऑक्सिजन येथील साईबाबा संस्थानच्या रुग्णांसाठी असल्याची माहिती बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी दिली.याबाबत पोलिसांनी सांगितले, की चाकण येथून हा आठ टन ऑक्सिजन असलेला टँकर रात्री निघाला होता.
संगमनेर हद्दीत आल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्तात शिर्डी शहरात टॅँकर आणण्यात आला. वजनाची तपासणी केल्यानंतर ऑक्सिजन साईबाबा संस्थानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला.
संस्थानच्या रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी या ऑक्सिजनचा वापर केला जाणार आहे. यासाठी विशेष बंदोबस्तदेखील पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला होता. यासाठी पोलीस कर्मचारी संजय अरुण, सागर डोईफोडे यांच्यासह सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला.
ऑक्सिजनची वाहतूक होत असताना कुठल्याही प्रकारची गडबड होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो.
जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारे ऑक्सिजन टँकरला बंदोबस्तात पोहोच केले जाते. यामागे रुग्णांसाठी जलदगतीने ऑक्सिजनचा पुरवठा झाला पाहिजे यासाठीदेखील पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे त्यांनी सांगितले.