अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- राज्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने अखेर मुंबईत आजपासुन पाहिले ते सातवीचे वर्ग सुरु झाले आहे.
महापालिकेचे शिक्षणधिकारी राजु तडवी यांनी मुंबई महापालिकेतील शाळा बुधवार पासुन सुरु होतील असा आदेश जारी केला होता.
मुंबई महानगरातील जवळपास १६ लाख ३९ हजार ५७८ विद्यार्थी तब्बल २० महिन्यांनी शाळेची पायरी चढणार आहेत. राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या ओमायक्रोन या व्हेरीएटमुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भिती निर्माण झाली होती.
त्यामुळे या शाळा सुरू होतील की नाही, असा संभ्रम पालकांन मध्ये होता. पण शाळा कोणत्याही परिस्थितीत सुरु होतील आणि त्यात कोणताही बदल होणार नाही असे शिक्षण विभागाने सांगितले होते.
मुंबई महापालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीचे वर्ग बुधवारपासून सुरू करण्याच्या सूचना पालिका शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
त्यामुळे मुंबई विभागातील बहुतांश शाळांची घंटा तब्बल २० महिन्यांहून अधिकच्या काळानंतर वाजणार आहे. दरम्यान, अनेक शाळा हे वर्ग सुरू करण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी घेणार असल्या तरी शाळांना वर्ग सुरू करणे बंधनकारक असणार असल्याचे पलिका शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
मुंबईत पहिली ते सातवीचे वर्ग असणाऱ्या खासगी आणि पालिकेच्या एकूण ३४२० शाळा आहेत. यात साडे दहा लाख विद्यार्थी शिकत आहेत.
महापालिकेच्या आदेशानुसार शाळेत मुलाच्या व्यवस्थापनाची पुर्णपणे तयारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन बॅचेसमध्ये शाळेत बोलवावं लागणार आहे.
काही ठिकाणी ओमायक्रोनच्या भितीने विद्यार्थ्यांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याच चित्र आहे. काही पालक अजूनही ऑनलाईन क्लासेस सुरु ठेवण्याच्या विनंती मध्ये आहे असे काही शाळाप्रमुखांनी सांगितलं आहे. काही पालकांनी शाळा नव्या वर्षात सुरु करावी, अशी भूमिका घेतलीय.