Maharashtra news:राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर सध्या महाराष्ट्रात शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांच्या बळावर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची याबाबत अध्यापही वाद सुरू आहे.
यादरम्यान महाविकास आघाडीमध्ये मंत्री म्हणून काम पाहिलेले अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी दोन दिवसांपूर्वी मला आपल्याशी बोलायचंय अशी साद त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घातली होती त्यामुळे शंकराव गडाख आता कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे सर्वच जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
शंकरराव गडाख यांनी निवडून आल्यानंतर त्यांनी नंतर शिवसेनेचे शिवबंधन बांधले होते. मात्र मध्यंतरी झालेल्या सर्व घडामोडींमध्ये शंकराव गडाख यांची भूमिका समोर न आल्याने कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू होती.
मात्र आज त्यांनी सोनई येथे भव्य दिव्य मेळावा घेऊन आपली राजकीय भूमिका जाहीर केली असून ते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार असल्याची त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
तसेच आमदार नाराज होते, हे खरे असले तरी ही निधी देत कामे केली पण ते गेले. या नाराजीचा एवढा स्फोट होईल असे आम्हाला वाटले नव्हते. नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे अभिनंदन। त्यांना सहकार्य राहील, असे गडाख यांनी म्हटले.
सोडून गेलेल्या आमदारांना मी काहीही बोलणार नाही. मलाही शिंदे गटाकडून फोन आला होता मात्र मी तिकडे न जाता ठाकरे यांच्या सोबत राहण्याचे ठरविले. गेले बरेच दिवस आजारी होतो,
त्यामुळे कार्यकर्त्यांसोबत बोलणे होत नव्हते. त्यामुळे आज हा मेळावा घेतला. आम्ही कोणताही वेगळा निर्णय घेतला नाही, जेथे आहोत तेथे राहून काम करणार आहोत, असे शंकरराव गडाख यांनी स्पष्ट केले.
याआधी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख तसेच नेवासा तालुक्यातील अनेक मान्यवरांनी उध्दव ठाकरे यांच्या मागे राहण्याची भूमिका मेळाव्यात बोलताना जाहीर केली होती. त्यामुळे शंकराव गडाख यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणार असल्याचे जाहीर केले असले तरी येणाऱ्या निवडणुकांमध्ये राजकीय भूमिका कशी राहणार याबाबत पुन्हा एकदा बैठक घेऊन चर्चा करून निर्णय घेऊ असेही त्यांनी बोलताना सांगितले.
मंत्रिपद गेले याचे दुःख नसून विकास थांबेल याचे दुःख असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं मात्र तरीही आपण आमदारकीच्या माध्यमातून नेवासा तालुक्याला विकासाबाबत कोणताही निधी कमी पडू देणार नाही असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.