अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावात ऊस तोडणी कामगाराची साडेचार वर्षाची मुलगी शुक्रवारी मध्यरात्रीपासून बेपत्ता होती.
तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु तिचा ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान सोमवारी सकाळी परिसरातील एका विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला आहे.
ब्राह्मणी-जुना वांबोरी रोड रस्त्यालगत ऊस तोडणी कामगाराची वस्ती आहे. त्यावस्तीपासून एक हजार मीटर अंतरावरील विहिरीमध्ये मृतदेह आढळून आला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी दिली.
बेपत्ता मुलीचा शनिवारी कुटुंबीयांनी दिवसभर तपास केला. शोध लागला नव्हता. अखेर शनिवारी सायंकाळी पोलिस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला.
रविवारी सकाळ पासून श्रीरामपूर पोलीस विभागाचे डीवायएसपी संदीप मिटके यांच्यासह नगरमधील शीघ्र कृती दलाच्या पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरू होते.
दरम्यान, सोमवारी सकाळी ब्राम्हणी गावातच वांबोरी रोड लगत एका विहीरीत बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह आढळून आला आहे.