अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील मुंगुसवाडे येथे बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या प्रोबीन बिरेश्वर बिश्वास (वय-३३ रा. बेराबेरीया, ता.आमडंगा, जि. उत्तर चोवीस परगणा, पश्चिम बंगाल) याला पाटोदा ( जि.बीड) येथुन पोलिसांनी अटक केली आहे.
येथे देखील हॉस्पिटल थाटून व्यवसाय करत होता. याबाबत सविस्तर असे की, दि.२७ मार्च २०१८ रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली होती. तेव्हापासुन बिश्वास पोलिसांना गुंगारा देत होता.
मुंगुसवाडे येथे डॉक्टर असल्याचे सांगुन बोगस वैद्यकीय व्यवसाय करीत असताना प्रोबीन बिश्वास यांच्या दवाखान्यावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे व त्यांच्या सहकाऱ्यानी दि. २७ मार्च २०१८ रोजी छापा टाकला होता. समोरच्या दरवाजातुन आलेल्या पथकाला पाहुन बिश्वास मागच्या दरवाजातुन पळुन गेला होता.
दराडे यांनी त्यावेळी गोळ्या औषधाचा मोठा साठा त्यावेळी जप्त केला होता व गुन्हा नोंदविला होता. वैद्यकीय अधिनियम ३३ व ३६ नुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवुन घेतला होता. पोलिसांनी तपास करुन आरोपी सापडत नव्हता.
मोबाईल नंबरच्या आधाराने पोलिस उपअधिक्षक सुदर्शन मुंडे यांच्या पथकातील संजय बडे, राजेंद्र केदार व रेवन्नाथ रांजणे यांनी बुधवारी दुपारी कुसळुंब (ता.पाटोदा जि.बीड) येथे छापा टाकला. तेथे आधार हॉस्पिटल या नावाने पुन्हा दवाखाना सुरु करणाऱ्या प्रोबीन बिरेश्वर बिश्वास याला ताब्यात घेतले.
बिश्वास याने तेथे नाव गाव बदलुन वास्तव्य सुरु केले होते. मात्र त्यांच्या मोबाईलच्या लोकेशनवरुन त्याला पकडण्यात आले. पाथर्डी तालुक्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र ते आरोपी पळुन गेल्याने त्यांना पकडणे अवघड झाले आहे.