अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून आपण सरासरी वीस हजारापर्यंत चाचण्या करत आहोत. चाचण्यांची ही गती कायम ठेवून आपल्याला बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या कराव्या लागणार आहेत.
तरच आपण कोरोना संसर्ग साखळी तोडण्यात यशस्वी होऊ. त्यासाठी, तालुका स्तरीय यंत्रणा आणि महानगरपालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उर्मिला पाटील, पल्लवी निर्मळ, जयश्री आव्हाड, रोहिणी नऱ्हे, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके हे जिल्हा मुख्यालय तर उपविभाग,
तालुकास्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, आपण दैनंदिन चाचण्यांची संख्या आता वाढविली आहे. त्याप्रमाणे काही तालुक्यांत तसेच नगरपालिका क्षेत्रात चाचण्या होत आहेत. मात्र कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणे आवश्यक आहे.
कारण कोरोनाचा धोका अजुन संपलेला नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचारही आपल्याला करावा लागणार आहे. त्यामुळे, बाधीत रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या घेतल्या जाणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात आता अत्यावश्यक सेवा बरोबरच किराणा दुकाने आणि इतर काही घटकांना सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेत व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गर्दी वाढून पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.
कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करावे. असे पालन न करणाऱ्या आस्थापना यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात १०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यासंदर्भात नगरपालिकांनी कार्यवाही करावी.
त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांची मदत घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात हिवरे बाजार पॅटर्न राबवला जात आहे. राज्याच्या पातळीवरही आता कोरोनामुक्त गावासाठी बक्षीस योजना जाहीर केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी आता कोरोना स्संसर्ग रोखला जाईल,
यासाठी प्रयत्न करावे. गटविकास अधिकारी, तहसीलदार यांनी यासाठी प्रयत्न करावेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक यांना सोबत घेऊन गाव संसर्गापासून दूर राहील, यासाठी सर्वांनी समन्वय आणि नियोजनपूर्वक काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्ह्यात १४ ठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक शेडचे बांधकाम पूर्ण करावे, त्याच्या जवळ किमान ७० बेडस व्यवस्था उभारणी या कामाकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.