अपंगाचे बनावट प्रमाणपत्र बनविणार्‍या दलालांचा शोध घ्या

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :-  नगर शहरात नुकतेच अपंगाचे बनावट प्रमाणपत्र बनविणार्‍या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.

दरम्यान जिल्ह्यातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवणार्‍या प्रमुख दलालांचा शोध घेण्यात यावा याबाबतच्या मागणीचे निवेदन सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना दिले आहे.

निवेदनात म्हंटले आहे कि, बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वापरुन दिव्यांग व्यक्तीसाठी असणारा लाभ घेण्याचा प्रकार मे 2018 मध्ये जिल्हा समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद यांचे निदर्शनास आला होता.

वास्तविक यावर जिल्हा परिषदेने तात्काळ गुन्हे दाखल करणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. वारंवार विनंती करुनही जिल्हा परिषद संबधीत दोषीवर कारवाई करत नसल्याने सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंबन करण्यात आले.

त्यानंतर फसवेगीरी करण्यार्‍या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. या गुन्ह्यातील आरोपी विक्रम विष्णुकांत राठी, विश्‍वनाथ ग्यानदेव फाळके, महेश दशरथ मते, सुनिल खंडु पवार यांच्याकडे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आढळून आलेले आहे. या आरोपीवरगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशाच प्रकारचे दिव्यांग प्रमाणपत्र अनेक लोकांकडे असण्याची व यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असल्याची शंका संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

म्हणूनच बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवणार्‍या प्रमुख दलालांचा शोध घेण्याची मागणी सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office