अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे (रा. बालिकाश्रम रोड सावेडी, नगर) याला हा हैद्राबादतून अटक करण्यात आली आहे.
बोठेला आज ( शनिवारी) संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास आलिशान खाजगी वाहनातून पारनेर पोलिस ठाण्यात पोहोचला. त्याला उद्या, रविवारी पारनेर न्यायालयापुढे हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, बोठे याच्यासह त्याच्या हैद्राबादी वकीलास व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात येत आहे. वकील जनार्दन अकुला यास न्यायालयात नेताना व परत आणताना त्यास बेड्या घालण्यात आल्या नव्हत्या.
तर महेश तनपुरे याला मात्र बेड्या घालण्याची तत्परता दाखविण्यात आली होती. बोठे ज्या वाहनातून आला होता त्या वाहनास तिरंगा ध्वजही होता.
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची ही बडदास्त पाहून पोलीस ठाण्यातील उपस्थित अचंबित झाले. बोठेला ठेवण्यासाठी एक बराक मोकळी करण्यात आली असून तिची स्वच्छता करून ठेवण्यात आली होती.
दरम्यान जरे यांच्या हत्याकांड प्रकरणी बोठे तब्बल १०३ दिवस फरार होता. दरम्यान त्याला आज बिलालनगर, हैदराबाद, आंध्रप्रदेश येथून अटक करण्यात नगरच्या पोलिस पथकाला यश आले.
आज (शनिवार) संध्याकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास बोठेला सुपे (पारनेर) पोलिस ठाण्यात आणण्यात आले.तेथे अटकेची कारवाई पूर्ण करुन त्याला पारनेर पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
या आरोपींना पोलिसांनी केले गजाआड :- चंद्राप्पा, राजशेखर अंजय चाकाली (वय २५ रा. गुडुर करीम नगर, मुस्ताबाद, आंध्र प्रदेश), शेख इस्माईल शेख अली (वय ३० रा. बालापुर, सरुरनगर, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश), अब्दुल रहमान अब्दुल आरीफ (वय ५२, रा. चारमीनार मस्जीद, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश) यांना अटक करण्यात आली,
तर पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (रा. हैद्राबाद) ही महिला फरारी आहे. बोठे याला नगरमधून मदत करणारा महेश वसंतराव तनपुरे (वय ४०, रा. कुलस्वामीनी गजानन हौसिंग सोसायटी, नवले नगर, गुलमोहर रोड, नगर) याला आज सकाळी अटक करण्यात आली.
तनपुरे हा बोठेशी नगरमधून संपर्कात राहत होता व येथून मदत करीत होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. बोठेच्या मुसक्या आवळून त्याला पारनेर येथे आणणार असल्याने बोठेची पत्नी सविता बोठे मुले यश आणि हर्ष यांच्यासह बोठेचे काही नातेवाईक पारनेर पोलिस ठाण्याचा आवारात संध्याकाळपासून उपस्थित होते.