अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- अहमदनगरच्या कलाकाराची प्रमुख भूमिका असणार्या ‘फिरस्त्या’ चित्रपटाने विदेशात भरारी घेतली आहे. जर्मनीमधील सर्वांत मोठा असणारा फिल्म फेस्टीव्हल म्हणजेच ‘इंडो-जर्मन फिल्म वीक’मध्ये या चित्रपटाची निवड झाली आहे.
नगरचा हूरहुन्नरी, अष्टपैलू कलाकार हरिष देविदास बारस्कर यांची प्रमुख भूमिका असणार्या ‘फिरस्त्या’ या चित्रपटाने याआधीही अनेक देशांच्या फिल्म फेस्टीव्हलमध्ये नाव कमावले आहे.
आता जर्मनीच्या बर्लिनमध्ये 23 ते 29 सप्टेंबर दरम्यान होणार्या ‘इंडो-जर्मन फिल्म विक’मध्येही उडी घेतली आहे. प्रदर्शनापूर्वीच फिरस्त्याने भारतासह, अमेरिका, रशिया, इंग्लंड, जपान, फ्रान्स, स्पेन, स्वीडन,
सिंगापूर, चेक रिपब्लिक आणि रोमानिया या 11 देशांमधील 24 इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल्समध्ये एकूण 57 पुरस्कार मिळवत पुरस्कारांचे ‘अर्धशतक’ पूर्ण केले आहे. ‘फिरस्त्या’ ही ग्रामीण भागातील एका मुलाच्या संघर्षाची कहाणी आहे.
धेयामागे धावणार्या या मुलाच्या बालपण, किशोरवय आणि तरुणपणीचा संघर्षमय प्रवासात घडणार्या घटनांवर आधारित हे कथानक आहे. ही गोष्ट केवळ त्या मुलाच्या जीवनातील नसून ‘फिरस्त्या’सारखे जीवन जगणार्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारी आहे.
विठ्ठल भोसले लिखित व दिग्दर्शित ‘फिरस्त्या’ चित्रपटाची निर्मिती डॉ. स्वप्ना विठ्ठल भोसले यांच्या झुंजार मोशन पिक्चर्स या संस्थेद्वारे झाली.
या चित्रपटाचे शूटींग सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अकोले खुर्द या गावात, तसेच पुणे, सातारा, दिल्ली, मुंबई या शहरांत झाले आहे.
या चित्रपटात हरिष बारस्कर, समीर परांजपे, मयूरी कापडणे, अंजली जोगळेकर, तसेच बाल कलाकार श्रावणी अभंग, समर्थ जाधव, आज्ञेश मुडशिंगकर यांच्या भूमिका आहेत.