अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा रुग्णालयातील अग्नीतांडवानंतर झेडपीच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील खासगी रुग्णालय, निवासी खासगी रुग्णालये यांच्या इमारतीचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.
येत्या 15 डिसेंबरपर्यंत ही तपासणी करून त्याचा सविस्तर अहवाल आरोग्य विभागाला सादर करायचा आहे . ग्रामीण भागातील खासगी हॉस्पिटलची नोंदणी आणि नुतनीकरण जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे करणे बंधनकारक आहे.
स्थानिक पातळीवर ही तपासणी करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी यांना तपासणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आलेले आहे. शासनाच्या नियमानुसार ग्रामीण भागात आर्थिक वर्षात दोन तपासणी होणे आवश्यक आहे.
ही तपासणी करताना संबंधीत रुग्णालय, खासगी रुग्णालय यांचे फायर ऑडिट झालेले आहे की नाही, त्या ठिकाणी अग्नी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झालेली आहे की नाही, याचा सविस्तर प्रस्ताव तयार करणे.
ही तपासणी झाल्यानंतर संबंधीत रुग्णालयास नुतणीकरणाच्या प्रस्तावास मंजूर द्यावी की नाही, याबाबतचा निर्णय झेडपीच्या आरोग्य विभागाला सादर करावा लागणार आहे.
त्या रुग्णालयावर कारवाई होणार….
ग्रामीण भागातील खासगी रुग्णालये आणि दवाखाने यांची तपासणी अहवालाच्या प्रत्येक पानावर तालुका वैद्यकीय अधिकारी यांची सही सक्तीची करण्यात आलेली आहे.
तसेच ज्या ठिकाणी नोंदणी न करताच खासगी रुग्णालये अथवा दवाखाने सुरू असल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करून त्याचाही अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिले आहेत.