अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- पावसाच्या पार्श्वभूमीवर 1 जून ते 31 जुलै या कालावधी पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास त्या नौकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. जून व जुलै महिन्यात मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते.
या कालावधीत मासेमारीस बंदी घातल्यामुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्यांचे जतन होते. तसेच या कालावधीत वादळी हवामानामुळे मच्छीमारांची जीवित व वित्त हानी होऊ नये यासाठीही ही बंदी घालण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
यासंबंधी मत्स्य व्यवसाय विभागाने काढलेल्या आदेशानुसार, दि. 1 जून 2021 ते 31 जुलै 2021 या कालावधीत राज्याच्या सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे.
मात्र, मासेमारी बंदी ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही. या आदेशानुसार पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत कोणतीही यांत्रिक मासेमारी नौका कोणत्याही कारणास्तव समुद्रात जाणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.