अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच पोलिसांनी एक लाख 49 हजार 289 जणांवर कारवाई करून तब्बल चार कोटी 83 लाख 22 हजार 500 रूपयांचा दंड वसूल केला.
विशेषबाब म्हणजे पोलीस विभागाने मार्च ते 7 जून 2021 या तीन महिन्याच्या कालावधीत ही आक्रमक कारवाई केली आहे. करोनाची दुसर्या लाटेत रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली.
तसेच शासनाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या होत्या. मात्र बेफिकीर लोकांनी कोविड नियमांचे सर्रास उल्लंघन केले. यामुळेच करोनाच्या दुसर्या लाटेत रूग्णसंख्या वाढली. मृत्यूचे प्रमाण वाढले.
शक्य त्या लोकांंविरूद्ध कारवाई करून करोना संसर्गाचे प्रमाण रोखण्यास जिल्हा पोलिसांनी हातभार लावला. दुसर्या लाटेत जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या कालावधीत काहींनी आस्थापना सुरू ठेवल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.
तीन महिन्यात 966 आस्थापनावर कारवाई करून 19 लाख 35 हजार 300 रूपयांचा दंड वसूल केला. दोन हजार 244 वाहने जप्त करून त्यातील एक हजार 951 कारवाई नंतर दंड वसूल करून सोडून दिली. मास्कचा वापर न करणार्या 29 हजार 53 जणांकडून एक कोटी 17 लाख 53 हजार रूपये,
सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन न करणार्या 35 हजार 449 जणांकडून 88 लाख 77 हजार 200 रूपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्या सात हजार 422 जणांकडून 16 लाख 31 हजार 300 तर संचारबंदीचे उल्लंघन करणार्या चार हजार 853 जणांकडून 37 लाख 56 हजार 600 रूपयांचा दंड वसूल केला.