अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संकटात तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी मानवता दृष्टीकोनाने कोव्हिड सेंटरसाठी गेल्या चार दिवसांत रविवारपर्यंत सुमारे स्वयंप्रेरणेने पाच लाख रूपयांचा भरीव निधी संकलित करून आदर्शवत कार्य केले आहे.
रूग्णांना दिलासा देण्यासाठी प्राथमिक शिक्षकांची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद व स्तुत्य असल्याचे मत पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले पाटील यांनी व्यक्त केले.
शेवगाव तालुक्यात रूग्ण संख्या वाढत असताना रूग्णांना शेवगावच्या कोव्हिड सेंटर मध्ये उपचार दिले जात आहेत.
उपचाराच्या विविध उपाययोजना करताना अडचणी येत असल्याचे लक्षात घेता तहसिलदार अर्चना पागिरे, गटविकास अधिकारी महेश डोके, नोडल अधिकारी शैलजा राऊळ यांनी मदतीचे दानशूरांना आवाहन केले होते.
त्याला प्राथमिक शिक्षकांनी प्रतिसाद देत गुरूवारपासून प्राथमिक शिक्षकांनी स्वेच्छेने मदतनिधी जमा करण्यास सुरूवात केली. व्हॉट्स अपद्वारे केलेल्या आवाहनास तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला.
शेवगावच्या उपक्रमाचे गुरूकूलचे शिक्षकनेते डॉ.संजय कळमकर, शिक्षक परिषदेचे नेते रावसाहेब रोहकले, राजेंद्र जायभाये, नारायण राऊत, राजू शिंदे, अनिल आंधळे, सचिन नाब्दे आदींनी स्वागत केले.
राज्यातील शिक्षक कोरोना संकट काळात सामाजिक उत्तरदायित्व निभावत असून शेवगावमधील हा उपक्रम जिल्हा व राज्याला मार्गदर्शक असल्याची प्रतिक्रिया ॲक्टिव्ह टिचर्स फोरमचे संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी व्यक्त केली