Maharashtra News:वळणावर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या कठड्याला जोरात धडकुन पुलावरून थेट २५ फूट खोल खड्यात कोसळली.
यात एकाच कुटुंबातील २ लहान मुलांसह ५ जण जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्या सर्वांवर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मूळचे अमरावती येथील आणि नोकरीनिमित्त रामनगर, हवेली, पुणे येथे राहणारे पोकळे कुटुंबीय पुण्याहून अमरावतीकडे जात होते.
सकाळी ६ च्या सुमारास कामरगाव शिवारात स्माईल स्टोन हॉटेलजवळ असलेल्या वळणावर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या कठड्याला जोरात धडकून पुलावरून खाली २० ते २५ फूट कोसळली.
कारमध्ये रविंद्र पांडुरंग पोकळे (वय ४८), त्यांचे बंधू राजेंद्र पांडुरंग पोकळे (वय ५२), पत्नी रुपाली रविंद्र पोकळे (वय ४०), मुलगा तनुज रवींद्र पोकळे (वय १७), मुलगी समृद्धी रविंद्र पोकळे (वय ११) हे ५ जण अडकले होते.
कार खाली कोसळल्याने तेथे मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून आलेल्या परिसरातील नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या पाचही जणांना बाहेर काढले व त्यांना उपचारासाठी नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. दरम्यान यातील दोघांना गंभीर स्वरुपाची इजा झालेली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.