अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- दोन दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी परप्रांतीय चटाई विक्रेत्यांना दमदाटी करीत त्यांच्याकडील सुमारे २३ हजार ५०० रुपयांची रोख घेतली. त्यानंतर, त्यांना मारहाण करीत पसार झाले होते.
ही घटना कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात नगर-मनमाड महामार्गावरील न्यू राजस्थान हॉटेल येथे घडली आहे. यातील पाचही आरोपींना पोलिसांनी २४ तासांच्या आत गजाआड केले आहे. या प्रकरणी शामलाल कारूलाल सी लोरीया (वय ३० रा.कराडीया ता.सीता जि. मंदसौर, मध्य प्रदेश) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पाच अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात रोहित उर्फ पप्पू रवींद्र गरुड (वय २६, रा.शारदा नगर, कोपरगाव), शहाबाज सय्यद (वय २६), शाहरुख शहाबाज शेख (वय २९), किरण निरभवणे (वय २१) व हृतिक उत्तम साळवे (वय २१, चौघे रा.येसगाव ता.कोपरगाव) अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन इंगळे यांनी गुप्त यंत्रेणेमार्फत पाचही आरोपींचा तपास करून २४ तासांच्या आता कोपरगाव शहरातून रात्री उशिरा शिताफीने अटक करून गजाआड केले आहे.