अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- वीज खांबावर काम करीत असताना एका कंत्राटी वीज कामगाराला शॉक बसल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे घडली होती.
या प्रकरणात निवृत्ती शंकर मुंगसे ( वय 32 वर्ष ) यांना शॉक बसल्याने ते गेल्या सहा दिवसांपासून बेशुद्ध अवस्थेत नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल होते.
गेली सहा दिवस मृत्युंशी त्यांनी झुंज दिली पण अखेर नियतीच्या मनात जे होते तेच झाले, मुंगसे यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज गुरुवारी ( दि. 25 ) रोजी थांबली व त्यांनी प्राण सोडले.
सविस्तर माहिती अशी कि, देवकौठे येथील निवृत्ती मुंगसे वीज वितरण कंपनीत कंत्राटी वीज कामगार म्हणून कार्यरत होते.
दि. 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास अधिकृतपणे इलेक्ट्रिक शटडाऊन घेऊन ते पारेगाव बुद्रुक शिवारात वीज खांबावर चढून काम करीत होते.
दरम्यान अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्यांना जबर धक्का लागला व ते खांबावरून खाली कोसळले. तेव्हापासून ते बेशुद्ध अवस्थेत होते.
त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सहा दिवसांपासून निवृत्ती मुंगसे हे बेशुद्ध अवस्थेत होते.
दरम्यान गुरुवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास निवृत्ती मुंगसे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक 12 वर्षांचा मुलगा व 10 वर्षांची मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने देवकौठे गावावर शोककळा पसरली आहे