अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये अग्रगण्य असलेल्या फोर्ब्स मार्शल या कंपनीच्या वतीने दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेण्यात आल्या.
औद्योगिक क्षेत्रामध्ये ७५ वर्षांचा यशस्वी प्रवास करणारी फोर्ब्स मार्शलची या कपंनी ओळख सांगितली जाते. अभियांत्रिकी क्षेत्राबरोबरच बीएस्सी, बीई इलेक्ट्रॉनिक्स, आयटीआय, बीकॉम या विद्याशाखेतून पदवीप्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी या कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येतात.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत चेअरमन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र प्लेसमेंट विभाग कार्यरत आहे. या माध्यमातून नामवंत कंपन्या विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेण्यासाठी येत असतात. फोर्ब्स मार्शल कंपनीने थेट मुलाखतींचे आयोजन केले होते.
यासाठी कंपनीचे टॅलेंट अॅक्वीजशन ऑफीसर विनीत पनविलकर, एक्जीक्युटीव कु.निलम बोगाडे, टॅलेंट अॅक्वीजशन असोसिएट कु.श्रध्दा जामदार यांनी चित्रफीतीव्दारे कंपनीच्या कामकाजाबाबत सविस्तर माहीती दिली.
याप्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, प्रा.मनोज परजणे, राजेंद्र निंबाळकर आदि उपस्थित होते. या कंपनीच्या प्रतिनिधींनी विविध विभागातील पदवी प्राप्त विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र मुलाखती घेतल्या.