अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- शिवसेने पासून दुरावलेले माजी नगरसेवक सचिन जाधव पुन्हा स्वगृही परतले आहेत. मातोश्रीवर मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत जाधव यांनी पुन्हा शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.(Shivsena Ahmednagar)
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकारातून हा प्रवेश सोहळा मुंबईत आज पार पडला. यावेळी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, नगरसेवक योगीराज गाडे, मदन आढावा यावेळी उपस्थित होते.
सचिन जाधव १९९० मध्ये बालशिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होते. अनिल राठोड यांचे विश्वासू आणि खंदे समर्थक असलेले सचिन जाधव २०१३ च्या सार्वत्रिक महापालिका निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. २०१५ मध्ये शिवसेनेकडून त्यांनी महापौरपदाची निवडणूक लढविली.
अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत केवळ एका मताने त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर २०१६ मध्ये शिवसेनेने त्यांना स्थायी समिती सभापती पदाची संधी दिली.
या कार्यकाळात त्यांनी शहरातील अनेक विकासकामे मार्गी लावली. २०१८ च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत जाधव यांनी शिवसेनेची साथ सोडत बहुजन समाज पक्षाकडून निवडणूक लढविली.
या निवडणुकीत पत्नी अश्विनी यांच्यासह चारही नगरसेवक त्यांनी निवडून आणत आपली राजकीय ताकद दाखवली. दरम्यान शंकराव गडाख यांच्या पुढाकारातून सचिन जाधव आज पुन्हा स्वगृही परतले.