अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत (वय 91) यांचे आज, पुण्यात निधन झाले. एल्गार परिषदेचे ते अध्यक्ष होते. गेल्या एक महिन्यापासून ते आजारी होते. आज, निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (मंगळवार, 16 फेब्रुवारी) पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.
पी. बी. सावंत यांचा जन्म 30 जून 1930 रोजी झाला होता. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते. सावंत यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एल.एल.बी) मिळविल्यानंतर सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे वकील म्हणून सराव सुरू केला.
1973 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. 1995 साली निवृत्त झाल्यानंतर ते सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन सहभागी राहिले. ते वर्ल्ड प्रेस कौन्सिल (लंडन) आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष राहिले होते. देश बचाव आघाडी तसेच लोकशासन आंदोलन पार्टीचे ते संस्थापक होते. 2002 च्या गुजरात दंगलीची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत काम केले.
2003 मध्ये तत्कालीन महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाचे पी. बी. सावंत अध्यक्ष होते.