अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळे धुमधडाक्यात पार पडत आहेत. यामुळे प्रश्नाने आक्रमक भूमिका घेतली आहे. करोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील 3 मंगल कार्यालयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
विशेषबाब म्हणजे या मंगल कार्यालयाच्या यादीत एक कार्यालय हे शहराचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचे देखील आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आदेश पारीत करत लग्न समारंभासाठी केवळ 50 लोकांनाच परवानगी दिलेली आहे.
असे असतानाही मंगल कार्यालयात त्यापेक्षा जास्त लोक जमवून सोहळे सुरू आहेत. शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मंगल कार्यालय व लॉन्सवर निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांच्या उपस्थितीबद्दल कारवाई करण्यात येत होती. कोतवालीचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने काल शुक्रवारी दिवसभरात शहरातील विविध मंगल कार्यालयाची तपासणी केली.
या तपासणीत नक्षत्र लॉन्स, निशा लॉन्स आणि लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात पन्नासपेक्षा जास्त वर्हाडी आढळून आले. अनेकांनी सोशल डिस्टन्सिंग न पाळता आणि मास्क लावलेले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी या तिन्ही मंगल कार्यालयाकडून प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड वसुल केला.
याशिवाय पोलीस पथकाने नगर शहरात विनामास्क फिरणार्या 83 जणांवर कारवाई करत प्रत्येकी पाचशे रुपयाप्रमाणे 41 हजार 500, मोटारव्हिकल अॅक्टच्या 30 केसेस करून 13 हजार 500 आणि कोटपा कायद्याच्या 5 केसेस करत 1 हजार असे 86 हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे.
लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमांच्या ठिकाणी संख्येवर मर्यादा राहील, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच रुग्णसंख्या वाढत असल्याने भविष्यात ही परिस्थिती गंभीर होऊ नये, यासाठी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन प्रशासन वारंवार करत आहे.