अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेतीसह नागरिकांच्या घरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
यातच जेऊर बायजाबाई परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह गावातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून संबंधित भरपाई द्यावी,
अशी मागणी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी निवेदनाद्वारे सोमवारी केली. भाजपाचे माजी आमदार कर्डिले यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात कर्डीले यांनी म्हंटले आहे कि, सीना आणि खारोळी नदीला पूर आला होता. या पुराचे पाणी जेऊर बाईजाबाई मधील दुकानात घुसले होते.
त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आधीच कोरोनाच्या काळात व्यावसायिक मोठ्या अडचणीत असताना नैसर्गिक आपत्ती ओढवल्याने आर्थिक अडचणीत सापडला आहे.
जिल्हा प्रशासनाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून अर्थसहाय्य करावे. तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली उभे पिके पावसाच्या पाण्याने वाहून गेली आहेत. शेतातील नुकसानीचे पंचनामे करून शासनाच्या वतीने आर्थिक मदत करावी.