माजी आमदार राहुल जगताप होणार जिल्हा बँकेचे अध्यक्ष ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या संचालक मंडळाची निवड फायनल झालेली आहे. त्यानंतर आता या महत्वाच्या बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी यंदाही जोरदार रस्सीखेच रंगणार आहे.

दि. ६ मार्च २०२१ रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदासाठीची निवड प्रक्रिया होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या सूचनेनुसार सर्व संचालकांना सभेची विषयपत्रिका पाठवण्यात आलेली आहे.

सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी पडद्याआडून राजकीय घडामोडी सुरु आहेत. अध्यक्षपदासाठी माजी आमदार राहुल जगताप व चंद्रशेखर घुले यांच्या नावाची चर्चा आहे.

बँकेतील नवनिर्वाचित संचालकांवर नजर टाकल्यास राष्ट्रवादीचे पारडे जड आहे. त्यामुळे बँकेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल, असे दिसते. राष्ट्रवादीकडून श्रीगोंद्याचे आमदार माजी आमदार राहुल जगताप व चंद्रशेखर घुले पाटील यांचे यांच्या नावावर चर्चा सुरू आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये जगताप व घुले यांच्या नावाबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीबाबत उपमुख्यमंत्री पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातही एक बैठक झाल्याचे समजते.

या बैठकीमध्ये ही अध्यक्ष व उपाध्यक्षाबाबत चर्चा झाली. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप हे इच्छुक आहेत. त्यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची संधी द्यावी, या मागणीसाठी श्रीगोंद्यातील राहुल जगताप यांचे शिष्टमंडळ येत्या मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान सध्या या बँकेत महाविकास आघाडीकडे १५ आणि भाजपकडे म्हणजे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील गटाकडे फ़क़्त ६ इतकेच संख्याबळ आहे. त्यातही कर्डिले यांचा सावतासुभा कायम आहे.

त्यामुळेच कर्डिले हे दोन्ही गटाकडून सहमतीचे अध्यक्ष म्हणून निवडून येण्याचा दावा नगर तालुक्यातील त्यांच्या समर्थकांनी केला आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24