अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- अकोल्याचे माजी आमदार वैभव पिचड यांनी अनुसूचित जाती व बिगर शेती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिचडांच्या नावाला विरोध होता. वैभव पिचड यांना बँकेवर घेण्यासाठी एका मातब्बर नेत्याने जोर लावला होता.
पवारांची समजूतही काढली होती. पवार यांनी हा आग्रह मान्य केल्याचेही म्हटले जात होते. गेल्या 24 तासात मात्र पुन्हा काही संदर्भ बदलले आहेत. काल सीताराम गायकर यांच्या विरोधातील अर्ज मागे घेताना ‘अगस्ती’चा संदर्भ समोर आला. भाजपात जावून गोत्यात आलेले पिचड सध्या पवारांचा राग कमी करण्याचा प्रयत्नात आहेत.
जिल्हा बँक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी माजी आमदार वैभव पिचड यांनी आपला अनुसूचित जाती व बिगर शेती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अकोले तालुक्यातुन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर हे राष्ट्रवादी च्या मदतीने बिनविरोध होण्याची शक्यता असून, भांगरे यांनाही इतर मागास प्रवर्गातून निवडणूक मैदानात उतरविण्यात आले आहे.
अकोले तालुक्यात पिचड यांना थांबविण्यात आले आहे. आत्तापर्यंत माजी आमदार वैभव पिचड यांचा एकमेव अर्ज माघारी घेण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातून वैभव पाचपुते की राहुल जगताप याबाबत यावर अजून एकमत झालेले नाही. कर्जत तालुक्यातून अंबादास पिसाळ व मीनाक्षी सोळुंके याचाही निर्णय अजून झालेला नाही श्रीरामपूर तालुक्यातून करण ससाने व भानुदास मुरकुटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल आहे .
भानुदास मुरकुटे यांचे चिरंजीव सिद्धार्थ मुरकुटे हे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत आहेत त्यामुळे मुरकुटे हे आता महाविकास आघाडीत सामील झाल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.