अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-मुळा धरणाचे दरवाजे अखेर उद्या(29 एप्रिल) रोजी उघडणार असून कोल्हापूर पद्धतीचे चारही बंधारे भरून दिले जाणार आहे.
राज्याचे नगर विकास तथा ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा होकार मिळवत धरणातून पाणी सोडण्यास मंजुरी आणली आहे.
याबाबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले की, उन्हाळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार धरणाखाली असलेल्या डिग्रस, मानोरी, वांजुळपोई व मांजरी बंधाऱ्यात पाणी सोडण्यासाठी जलसंपदा विभागाची मंजुरी गरजेची होती.
त्यानुसार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली असता पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
धरणाचे दरवाजे (29एप्रिल) उचलून बंधारे भरून दिले जाणार आहे. मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी पाणी सोडण्याबत पाटबंधारे विभागाकडून हालचाली सुरू असल्याचे सांगितले.
मुळा धरणात 14 हजार 358 दलघफू पाणी साठा शिल्लक आहे. 14 हजार दलघफू पाणी साठ्या पर्यंतच दरवाज्यातून पाणी बाहेर पडते.
दरवाज्यातून पाणी बंधाऱ्यात जमा केले जाईल. अंदाजे 350 दलघफू पाणी बंधाऱ्यात जमा होईल. त्याचा लाभ नदी पात्र लगतच्या शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगितले.