अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने चिंताही वाढली आहे. यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील एका मोठ्या नेत्याचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते.
त्यांची शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर सांत्वनपर भेटीही सुरू आहेत. त्यामध्ये नातेवाईकांसोबतच मंत्री, नेते, आणि लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे.
आज त्याच दिवंगत नेत्याच्या कुटुंबातील चौघांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. कुटुंबातील एक ज्येष्ठ महिला, दोन तरुण पुरुष आणि एका लहान मुलीचा यामध्ये समावेश आहे.
याशिवाय नातेवाईक आणि नीकटवर्तीयांपैकी काहींचे अहवालही पॉझिटीव्ह आल्याचे सांगण्यात आले. शहरातील नव्या करोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढली असून गेल्या २४ तासांत २९१ जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे अंत्ययात्रेला हजरी लावलेल्यांमध्ये आणि नंतर भेटीला गेलेल्यां मध्येही खळबळ उडाली आहे. दरम्यान जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने चिंताही वाढली आहे.
गेल्या २४ तासांत ८५७ नव्या बाधितांची नोंद झाली. यामध्ये नगर शहरातील २९१ रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता चार हजारपर्यंत पोहोचली आहे.
असे असले तरी बाकीच्या गोष्टींचा विचार करता लॉकडाऊनचा निर्णय घाईघाईने घेतला जाणार नाही, त्यापेक्षा उपाययोजना आणखी कडक करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.