अहमदनगर – जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी अटक केलेल्या चौघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आज बुधवारी या चार जणांना न्यायालयासमोर हजर केले होते.
यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिकांचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शनिवारी (६ नोव्हेंबर) जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागाला आग लागली. या दुर्घटनेत अकरा रुग्णांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी स्वतः ही कारवाई केली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या संवेदनशील प्रकरणाची गंभीरता पाहता याप्रकरणातील चौघांना अटक करण्यात आलेली आहे.