अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून दरोडा टाकणार्या टोळीतील चौघांना अटक करण्यात आली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा व नगर तालुका पोलिसांनी संयुक्त केली.
या चौघांना पोलिसांकडून अटक रामदास चंदन भोसले (वय 50), परमेश्वर पविकांत काळे (वय 20), शिवदास रामदास भोसले (वय 23), प्रतिक रामदास भोसले (वय 19 सर्व रा. घोसपुरी ता. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, संदीप धागे नामक व्यक्तीने संपर्क करून औरंगाबाद येथील मिलिंद कान्हाजी काशिदे व त्यांच्या बंधूला स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखविले होते. या आमिषाला बळी पडून ते दोघे 20 जुलै रोजी नगर तालुक्यातील सारोळा कासा शिवारात आले.
तेथे असलेल्या आठ ते 10 जणांनी काशिदे बंधूंना मारहाण करीत त्यांच्याकडील रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल असा सात लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.
काशिदे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन नगर तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून चौघांना अटक केली.