अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- लष्करी अधिकारी असल्याचे भासवून अनेकींशी विवाह करून फसवणूक करण्याचे तसेच त्यांच्या नातेवाइकांकडून तरुण मुलांना नोकरीला लावण्याचे
आमिष दाखवून लाखो रुपये उकळण्यात आल्याचा गेल्या आठवड्यातला दुसरा प्रकार पुण्यात घडला आहे.
नगरच्या व्यक्तीलाही अटक :- लष्करी अधिकारी असल्याचे भासवून तरुणींशी जवळीक साधत हा तरुण त्यांना लग्नाच्या बंधनात अडकवत होता. तसेच त्यांच्या ओळखीच्या नातेवाइकांमध्ये असलेल्या तरुण मुलांना लष्करात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल करत फसवणूक केल्याचा धक्कादायक उघडकीस आला आहे.
या प्रकरणी बिबवेवाडी येथे राहत असलेल्या तरुणीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.
आरोपी योगेश दत्तू गायकवाड (वय २७ रा.मु. डोंगरगाव, ता.कन्नड जि.औरंगाबाद) व त्याचा साथीदार संजय ज्ञानबा शिंदे (वय ३८, रा. केडगाव ता.जि.अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
लष्करी गणवेशासह अन्य साहित्य जप्त :- बिबवेवाडी पोलिसांनी आरोपीकडून लष्कराचे कपडे, खोटे शिक्के, बनावट बिल्ले, टी शर्ट वेगवेगळ्या प्रकारच्या वापरल्या जाणाऱ्या टोप्या तसेच खोटी जॉइनिंग लेटर्स व एक चारचाकी गाडी,दोन दुचाकी गाड्या असा एकूण पाच लाख ४१ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
असा केला विश्वास संपादन :- बिबवेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी अणि तिची आई बिबवेवाडी येथील एका हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी करण्यासाठी आल्या होत्या.
त्या हॉस्पिटलच्या बाहेर रिक्षाची वाट बघत असताना पँटच्या मागील खिशातून आधारकार्ड पडल्याचे फिर्यादीने पाहिल्यामुळं ते परत देण्यासाठी आरोपी संजय शिंदेला आवाज दिला. यानंतर आरोपीने फिर्यादीशी जवळीक साधत लष्करी अधिकारी असल्याचं सांगितलं.
त्याच्या जवळील लष्करी पोशाखातील फोटो व बनावट ओळखपत्र दाखवून फिर्यादी तरुणी व तिच्या आई वडिलांचा विश्वास संपादन करत तरुणीशी लग्न केले.
चार मुलींशी लग्न :- आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने टाळेबंदीचे कारण सांगत नातेवाइक, मित्रमंडळी, भटजी विना बंद खोलीत आतापर्यंत चार मुलींशी लग्न केले आहे. तसेच एका पत्नीला त्याच्यापासून दोन अपत्ये आहे.
तो आणखी ५३ मुलींच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर आरोपी योगेश गायकवाडने लष्करात मोठी भरती निघाल्याचे सांगत फिर्यादीच्या भावाला लष्करात नोकरी लावून देतो, म्हणून फिर्यादीच्या वडिलांकडून दोन लाख रुपये घेतले.
तसेच फिर्यादीच्या गावातील नातेवाइकांचा व गावाबाहेरील तरुणांचा विश्वास संपादन करत त्यांना नोकरी लावून देतो असे सांगून त्यांच्याकडून पन्नास लाख रुपये घेतले. तसेच फिर्यादीच्या भावाचे व इतर काहीजणांची खोटे जॉईनिग लेटर दाखवत फसवणूक करून विश्वासघात केला.