अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- सध्याच्या काळात ऑनलाईन खरेदीचे प्रमाण वाढले आहे. त्याचा बरोबर सायबर गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले आहे.
सायबर गुन्हेगारांनी गुगलवर बनावट मोबाईल नंबर अपलोड करून ठेवलेला आहे. या नंबरवर फोन केल्यावर लोकांची फसवणूक झाल्याच्या पाच महिन्यांत 90 तक्रारी येथील सायबर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
तंत्रज्ञानाच्या युगात विविध स्वरूपाची ऑनलाईन सेवा देणार्या बहुतांश कंपन्या मार्केटमध्ये कार्यरत आहेत. ऑनलाईन सेवा घेताना काही अडचण आल्यास ग्राहक सदर कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करून तक्रार नोंदवितो.
ज्या कंपनीची सेवा घेतली आहे त्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर बहुतांश लोकांना माहिती नसतो. अशावेळी ग्राहक गुगलवर त्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर सर्च करतात. बहुतांश वेळेस गुगलवरून बनावट कस्टमर केअर नंबर ग्राहकांना मिळतात.
हे नंबर सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीच्या उद्देशाने अपलोड करून ठेवलेले असतात. या नंबरला फोन केल्यानंतर गुन्हेगार तक्रार करणार्या व्यक्तीची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करतात. बनावट कस्टमर केअरला फोन लागला आहे हे बहुतांश जणांच्या लक्षात येत नाही.
तक्रार नोंदवून घेण्याच्या नावाखाली तसेच रिफंड तत्काळ देण्याचे सांगून गुन्हेगार सदर ग्राहकांना काही अप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगतात किंवा मोबाईलवर लिंक पाठवतात. मोबाईलमध्ये हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केले किंवा मिळालेल्या
लिंकवर ओपन केल्यास पुढील प्रक्रिया केल्यानंतर ग्राहकाच्या बँक खात्यातून पैसे जातात. ऑनलाईन खरेदी अथवा ऑनलाईन आर्थिक व्यवहारात अडचण आल्यास कुठल्याही कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करताना प्रथम तो नंबर अधिकृत आहे का, याची खात्री करून घ्यावी. असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.