विद्युत वाहनांसाठी संगमनेरात मोफत चार्जिंगची सुविधा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- संगमनेरातील विजेवर वाहने चालविणाऱ्यांसाठी नगरपालिकेने अभिनव सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. नगरपालिकेत उपलब्ध असलेल्या सौर उर्जेच्या सहाय्याने पालिकेच्या प्रांगणात चार्जिग सेंटर उभारण्यात आले असून या सेंटरमध्ये वाहनचालकांना आपल्या वाहनांची मोफत चार्जिंग करता येणार आहे.

पर्यावरणाचा दिवसेंदिवस होणारा ऱ्हास व यामुळे निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्­न यावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत दोन दिवसांपूर्वी संगमनेर नगरपालिकेने मोफत चार्जिंगचा उपक्रम सुरु केला आहे.

संगमनेर नगरपालिका कार्यालयाच्या आवारात हे चार्जिंग सेंटर सुरु करण्यात आले असून यातून मोफत चार्जिंगची सुविधाही त्वरीत सुरु करण्यात आली आहे.

प्रादेशिक उपसंचालक श्रीमती संगिता धायगुडे यांनी बुधवारी संगमनेर नगरपालिकेत येवून या उपक्रमाची पाहणी केली. संगमनेर नगरपालिकेला पूर्वी वीजेचे जास्त बिल यायचे. यावर नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या प्रयत्नातून मात करण्यात आली आहे. पालिकेने सौर उर्जा प्रकल्प यशस्वीपणे राबविला असून या प्रकल्पातून दीडशे युनिटची निर्मिती होते. स्वत:चीच विजेची व्यवस्था झाल्याने पालिकेला विज बिलासाठी दर महिन्याला द्यावे लागणारे ५० हजार रुपये वाचले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24