अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- दीन, दुबळ्यांना आधार देण्याचे काम फिनिक्स फाऊंडेशनने केले. अनेक दृष्टीहिनांना नवदृष्टी देण्याचे काम शिबीराच्या माध्यमातून करुन वंचितांच्या जीवन प्रकाशमय केले. आपल्या कार्यालयातील एक कर्मचारी हिमालयाच्या उंचीचे सामाजिक कार्य उभे करतो हे पाहून अभिमान वाटत असल्याची भावना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता इंजी. गणेश नान्नोर यांनी व्यक्त केली.
तर फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन या कार्यात हातभार लावण्याचा मानस व्यक्त केला. फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी इंजी. नान्नोर बोलत होते.
यावेळी पाटबंधारे विभागाचे उप अभियंता सुनिल जगताप, फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, वैभव दाणवे, किरण कवडे, बाळासाहेब धीवर, ओमकार वाघमारे आदी उपस्थित होते. जालिंदर बोरुडे यांनी मागील 28 वर्षापासून फिनिक्सच्या माध्यमातून दृष्टीदोष असलेल्या गरजू घटकातील नागरिकांसाठी अविरतपणे मोफत शिबीर घेण्यात येत आहे.
लाखो गरजूंनी या शिबीराचा लाभ घेतला. तर नेत्रदान चळवळीच्या माध्यमातून हजारो व्यक्तींना नवदृष्टी मिळाली. कोरोना काळातही नागरिकांची गरज ओळखून हे शिबीर सुरु होते. वंचित घटकातील रुग्णांसाठी हे शिबीर अविरतपणे सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उप अभियंता सुनिल जगताप यांनी आरोग्य सुविधा खर्चिक असल्याने सर्वसामान्यांच्या परवडत नाही. फिनिक्स फाऊंडेशन राबवित असलेल्या शिबीराच्या माध्यमातून त्यांना मोठा आधार झाला असल्याचे त्यांनी सांगितले. गावातील संत सावता महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबीरात 213 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
63 गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन करण्यात आले. तर गरजूंना मोफत नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता शासनाच्या नियमांचे पाळन करुन हे शिबीर घेण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र बोरुडे यांनी केले. आभार गौरव बोरुडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौरभ बोरुडे, आकाश धाडगे आदींसह ग्रामस्थ व फिनिक्सच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.