अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- करोनोबाधित व त्यांच्या नातेवाईकांना ऐनवेळी कोविड सेंटर परिसरात जेवण मिळण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते. जवळचेही मदतीला येत नाहीत.
सर्वत्र लॉकडाऊन असल्याने कुठेच जेवणाची व्यवस्था होत नाही. त्यामुळे माणुसकी संपली की काय? असा प्रश्न निर्माण होतो.
याचा विचार करून नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील यशराज हॉटेलचे मालक राहुल जावळे यांनी दोन वेळचे घरगुती पद्धतीने जेवण रुग्ण व त्याच्या नातेवाईकांसाठी देणे सुरू केले आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याने या आजाराची दाहकता सर्वत्र बघायला मिळत आहे.
रुग्णांची संख्या वाढत असल्याने बेड मिळत नाही. कुकाणा व भेंडा परिसरात चार ते पाच खासगी व शासकीय कोविड सेंटर आहेत. यामध्ये नगर, राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, पाथर्डी, गंगापूर, पैठण तालुक्यातील रुग्ण दाखल असून त्यांच्याबरोबर नातेवाईकदेखील आहेत.
त्यांचे जेवणाचे हाल होत असल्याचे बघुन जावळे यांनी जमेल तितक्या रुग्णांना अहोरात्र जेवणाचा डबा सुरू केला आहे. त्यांनी हॉटेलच्या समोर व सोशल मीडियावर आपल्या हॉटेलचा मोफत जेवणाचा फलक लावला आहे. त्यावर मोबाईल क्रमांकदेखील दिला आहे.
पोलीस व आरोग्य कर्मचारी तसेच अनेक इतर कर्मचारी जीवाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यापुढे आपले काम काहीच नाही. या लढ्यात मदतीसाठी पैसा किंवा मोठे पद असण्याची गरज नाही, हे जावळे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
ही प्रेरणा जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व माजी आमदार पांडुरंग अभग यांच्याकडून मिळाली असल्याचे जावळे यांनी सांगितले.