अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-संजीवनी उदयोग समूहामार्फत संजीवनी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत करण्याचे काम सुरू आहे.
सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजन बेडची मोठया प्रमाणात कमतरता जाणवत असल्याने संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये मोफत ऑक्सिजन बेड सुविधा सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा बॅँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी दिली.
आत्मा मालिक शैक्षणिक संकुलामध्ये सुरू करण्यात आलेल्या संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये सुमारे ४० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व २० ऑक्सिजन सिलेंडरद्वारे रूग्णांना सेवा दिली जाणार आहे.
ही व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली असुन कोल्हे यांनी त्यांची नुकतीच पाहणी केली. ते म्हणाले, संजीवनी उदयोग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे आणि माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या सेंटरमध्ये सध्या अनेक रूग्ण उपचार घेत आहेत;
परंतु अनेक रूग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासत असल्याने ही सुविधा तातडीने मिळत नाही. सहजासहजी ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाही, रूग्ण व नातेवाईकांचे मोठया प्रमाणात हाल होत आहेत,
त्या दृष्टीकोनातून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. यापुढेही आणखी ४० ऑक्सिजन बेड सुरू करण्याचा मानस आहे. येथे रूग्णांना फेबीपिरावीरसारखे महागडी औषधेही कमी दरात उपलब्ध करून दिले जात असून गरजूंना ही औषधे मोफत दिली जाणार आहेत.