अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- राज्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. यातच पावसाची अद्यापही काहीच शक्यता दिसत नसल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकर्यावर ओढवले आहे.
यामुळे बळीराजा हतबल झाला असल्याने शासनाने या शेतकर्यांना मोफत बी बियाणे व खतांचा पुरवठा करावा अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
दरम्यान पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा मोठ्या अडचणीचा सामना करत आहे. यामुळे भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांना आपल्या निवेदनात म्हटले आहे, चालू खरीप हंगामात सुरुवातीला काही ठिकाणी पाऊस बरसला.
त्या आशेवर कोपरगाव मतदारसंघातील शेतकर्यांनी पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. अजूनही पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला नाही. त्यामुळे या शेतकर्यांनी कर्ज काढून, दाग दागिने गहाण ठेवून खरीप पेरणीसाठी महागाचे बियाणे खरेदी करून पेरणी केली आहे.
पाऊस नसल्यामुळे हे बी पूर्णपणे जळून गेले आहे. अनेक ठिकाणी पेरण्या वाया गेल्या आहेत. करोनाच्या संकटानंतर दुबार पेरणीचे संकट शेतकर्यांवर ओढवले आहे.
तेव्हा शासनाने या शेतकर्यांना मदतीचा हात देण्यासाठी अशा कठीण प्रसंगी पुढे यावे व दुबार पेरणीसाठी त्यांना मोफत बी-बियाणे, खते, कीटकनाशकांचा पुरवठा करावा. अशी मागणी करण्यात आली आहे.