अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-नगर तालुक्यातील रुई छत्तीसी गावात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. आजवर १२ ते १५ लोकांचा कोरोनाने मृत्यूही झालेला आहे.
गावात कोरोनाबाबत जागृती व्हावी आणि गाव कोरोना मुक्त व्हावे यासाठी गावातील शिक्षक आणि नोकरदार यांनी १५ मेपर्यंत गाव आणि वॉर्ड कोरोनामुक्त करणारांसाठी रोख स्वरूपात बक्षीस देण्याचा उपक्रम हाती घेतला.
रुईछत्तीसी गावची लोकसंख्या ५ हजारांच्या आसपास आहे. लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि कोरोनाची कमीत कमी झळ बसावी या भावनेतून गावातील शिक्षक आणि नोकरदार यांनी एकत्र येत उपक्रम हाती घेतला.
१५ मेपर्यंत लवकर कोरोनामुक्त होणाऱ्या वॉर्डासाठी बाबासाहेब पाडळकर यांनी ११ हजारांचे, दुसऱ्या क्रमांकासाठी ग्रामसेवक अशोक जगदाळे यांनी ७५०१, तर तिसऱ्या क्रमांकासाठी झुंबर भांबरे यांनी ५५०१ रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.
उत्तेजनार्थ जगन्नाथबाबा शिक्षक बचत गटाकडून देण्यात येणार असून ट्रॉफी आणि प्रमाणपत्र जालिंदर खाकाळ, संतोष भवर, दत्तात्रय काळे यांच्याकडून देण्यात येणार आहेत. परीक्षण समितीमध्ये डॉ. विशाल काळे,
डॉ. भिवसेन भागवत, डॉ. रविकांत ओझा, डॉ. नितीन शेळके, डॉ. विनायक खाकाळ, डॉ. संजय शेळके, डॉ. नम्रता भांबरे, डॉ. ससाणे यांचा समावेश आहे. वॉर्डात जास्तीत जास्त लसीकरण, घरोघरी भेटी देऊन जनजागृती, वॉर्डात स्वच्छता राखणे,
अशा विविध मुद्यांवर परीक्षण होणार आहे. गावात ४ वॉर्ड असून माजी उपसभापती रवींद्र भापकर आणि माजी सरपंच रमेश भांबरे गटाचे सर्व सदस्य गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नाला लागले आहेत.