अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- कोपरगाव शहर पोलिसांनी कारवाईचा सिलसिला सुरूच ठेवला असल्याचे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत. सोमवारी (ता.१९) दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास डाऊच खुर्द शिवारातील खडक वसाहत भागातील काटवनात कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या २० लहान-मोठ्या गोवंश जनावरांची पोलिसांनी मुक्तता केली आहे.
ही जनावरे कोकमठाण येथील गोकुळधाम गोशाळेत पाठविली आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार डाऊच खुर्द शिवारातील खडक वसाहत भागातील काटवनात कत्तलीच्या उद्देशाने २० लहान-मोठी गोवंश जनावरे निर्दयतेने बांधून ठेवलेली आहेत.
त्यानुसार तेथे स्वतः पोलीस निरीक्षक देसले, उपनिरीक्षक बी. सी. नागरे, सहा. फौजदार एस. जी. ससाणे, पोलीस शिपाई राम खारतोडे, प्रकाश कुंढारे यांनी छापा टाकला असता त्यांना २ लाख ३६ हजार रुपयांची गोवंश जनावरे आढळून आली.
ही सर्व जनावरे ताब्यात घेऊन कोकमठाण येथील गोकुळधाम गोशाळेत पाठविली. या प्रकरणी शहर पोलिसांनी युनूस सिकंदर शेख (वय ४४) व अक्रम फकीर कुरेशी (वय ३०) या दोघांविरोधात गुरनं.२२४/२०२१ प्राण्यांस निर्दयतेने वागविणे
अधिनियम १९६० चे कलम ११ (१) एच व महा. प्राणी संरक्षण कायदा व सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५ (ब) व ९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.