मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या १३१ व्या जयंती निमित्त बोलताना काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे.
पाटोले यांनी भारताचे स्वातंत्र्य व संविधान (Constitution) आज धोक्यात असून देशात संविधानाचे नियम धाब्यावर बसवून भाजपकडून मनमानी कारभार सुरु आहे असे बोलत थेट केंद्र सरकारवर (central government) टीका केली आहे.
यावेळी नाना पटोले म्हणाले, ‘माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने (Constitution) दिला आहे. सर्व समाजाचे न्याय व हक्क अबाधित ठेवण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून होत आलेले आहे.
देशातील भारतीय जनता पक्षाचे सरकार संविधानिक संस्था संपवून संविधानच संपुष्टात आणण्याचे काम करत आहेत. या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी डॉ. बाबासाहेब यांनी दिलेले संविधान वाचवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे’, असे पटोले म्हणाले आहेत.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन नाना पटोले यांनी महामानवास अभिवादन केले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, जाती धर्मात विष पेरून काही पक्ष व संघटना सामाजिक वातावरण दूषित करण्याचं काम करत आहेत.
देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो. पण काही लोक संविधानाला धाब्यावर बसवून मनमानी कारभार करत आहेत. देशाला मिळालेले स्वातंत्र्य व संविधान आज धोक्यात असून ते वाचवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.