अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- आज (सोमवार) 45 वर्षाच्या पुढे व्यक्ती ज्या फ्रंटलाईन मध्ये काम करत आहे, अशांना दुसरा डोस दिला जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.
दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून लसीचा साठा नसल्याने नगर शहरातील लसीकरण केंद्र बंद आहेत. मात्र रात्रीतून हजार ते बाराशे डोस मिळाल्यानंतर मनपाच्या प्रत्येक केंद्रावर 100 ते 150 डोस दिले जातील.
यामधून जे 45 वर्षांच्यापुढील फ्रंटलाईन वर्कर त्यांना दुसरा डोस देण्यात येणार असल्याचे डॉ. बोरगे यांनी सांगितले. दरम्यान नगर शहरांमध्ये आतापर्यंत 75 हजार लोकांना लसीकरण करण्यात आलेले आहे.
यात काहींचे दोन डोस पूर्ण झाले आहेत तर काहींना फक्त पहिलाच डोस मिळाल्याने ते दुसर्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. दुसरीकडे डोस कमी प्रमाणामध्ये मिळत असल्यामुळे सध्या फक्त महानगरपालिकेच्या सात केंद्रामध्ये ते डोस दिले जात आहेत.
…त्यामुळे उपकेंद्र वाढवता येत नाही :- उपकेंद्र देण्यासाठी आमची पूर्ण तयारी आहे. मात्र लसीचा साठा त्याप्रमाणात येत नाही, त्यामुळे उपकेंद्र वाढवता येत नाही.
आत्तापर्यंत आम्ही तीन उपकेंद्र सुरू केलेले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये जर साठा आम्हाला उपलब्ध झाला तर नगर शहरामध्ये आम्ही उपकेंद्र देण्यास सुरुवात करणार असल्याचे डॉ. बोरगे यांनी यावेळी सांगितले.